महाराष्ट्री प्राकृत गाथा ११
मरगअसूईविद्धं व मोत्तिअं पिअइ आअअग्गीओ।
मोरो पाउसआले तणग्गलग्गं उअअबिंदुम्।।
अर्थ : पावसाळ्यात गवताच्या टोकावर लटकणारा व पाचूच्या सुईने विद्ध झालेल्या मोत्याप्रमाणे दिसणारा पावसाचा थेंब - पाण्याचा थेंब मोर मान उंच करून चोचीने टिपून घेत आहे.
स्पष्टीकरण : मोराचे असे पाऊसथेंब टिपणे अत्यंत मनोहर आहे, यात शंका नाही. गाथाकवीचे सूक्ष्मातिसूक्ष्म निरीक्षण आणि अप्रतिम वर्णनशैली यांचे येथे दर्शन घडते. गवताचे अग्र, त्यावर लटकलेला पावसाचा थेंब, थेंबातून दिसणारे गवताचे अग्र. निरीक्षण आणि कल्पनारम्यता यांचे अद्भुत मिश्रण येथे पाहायला मिळते. या सुरेख दृश्याच्या पार्श्वभूमीवर देखणा मोर उभा केला आहे. तो केवळ उभा नाही तर त्या थेंबाला मोती समजून, मान उंच करून टिपून घेत आहे. मोराचा सर्व डौलदारपणा इथे प्रकट झाला आहे. मोत्याचा चारा हे खरे तर राजहंसाचे खाद्य. परंतु या ठिकाणी वास्तवतेला धक्का न लावता मोर उभा केला आहे. गवताचे हिरवेपण, थेंबातून पाझरणारा सूर्यप्रकाश आणि मोराचे थेंब टिपणे हे एखादा कॅमेरामन आपल्या अत्याधुनिक कॅम-याने टिपूही शकेल. परंतु गाथाकवीच्या निसर्गदत्त दृष्टीने टिपलेले हे दृश्य औरच.
महाराष्ट्री प्राकृत गाथा १२
पिसुणन्ति कामिणीवं जल लुक्कपिआवऊहण सुहेल्लिम्।
कण्डइ अकलोलुष्फुल्लणिच्चलच्छीइँ व अणाइँ।।
अर्थ : जलक्रीडा करणा-या कामिनीच्या कपोलांवर काटा आलेला आहे. तिची नजर निश्चल आहे. मुद्रा प्रफुल्ल आहे. तिच्या प्रियकराने पाण्यात डुबी घेऊन घेतलेल्या आलिंगनामुळे तिला होणारे सुख या चिन्हांवरून सूचित होते.
स्पष्टीकरण : जलक्रीडा करण्यात केवढा आनंद असतो! त्यातही प्रियकराची संगत असेल तर मग आनंदाला सीमाच नसते. एखादे वेळी उदासीन प्रियतमाला ‘यमुनाजळी खेळू खेळ कन्हैया' अशी सादही घातली जाते. गार पाण्याच्या लाटांनी शरीरावर आधीच काटा फुललेला असतो. त्यात प्रियकराचा स्पर्श झाला की मग विचारायलाच नको. पाण्यात बुडी घेऊन गाढ आलिंगनाचे सुख मिळत असेल तर ते कुणाला नको असते? अशीच एक भाग्यवती या गाथेत दृष्टीसमोर उभी राहते. अवतीभोवतीचे गार पाणी, त्याच्या विशाल छातीवर विसावलेले, दबलेले तिचे स्तनकलश, गार पाण्यातही शरीरात उत्पन्न झालेली ऊब - हा सर्व गहिरा अनुभव या गाथेत मांडलेला आहे. क्वचित् त्याच्या तळहातावर विसावलेला, हातात न मावणारा तिचा स्तनभार, त्यामुळे अंगांगात लकाकून गेलेली वीज या अनुभवामुळेच तिच्या कपोलावर काटा आला आहे. तिची नजर गहिरी अन् निश्चल झाली, चेहरा प्रफुल्ल झाला! एवढे परिवर्तन जलाशयातील एका गाढ आलिंगनाने झाले!
महाराष्ट्री प्राकृत गाथा १३
उप्पाइअदव्वाणँ वि खलाणँ को भाअणं? खलो च्चेअ।
पक्वाइँ वि णिम्बफलाइँ णवरँ काएहिं खज्जन्ति।।
अर्थ : दुष्टांनी द्रव्य संपादन केले तर ते त्याचे दान कोणाला करतात? अर्थात हलकटांनाच. लिंबाची फळे पिकली तरी ती कावळेच खाणार.
स्पष्टीकरण : उत्तम व्यवहाराने नव्हे, तर अधम व्यवहाराने पैसा मिळविणारे दुष्ट लोक असहाय लोकांना लुटतात आणि त्या दुष्टांना गणिका, कलाल आणि कोतवाल लुटतात. एकूण काय, तर वाईट मार्गाने आलेली संपत्ती त्याच मार्गाने निघून जाते, हेच सत्य या गाथेत ध्वनित झाले आहे. काळा बाजार करणारे द्रव्य मिळवतात. पण त्याचा विनियोग वाममार्गाकडेच होतो. चांगल्या मार्गाने हे द्रव्य जात नाही. द्रव्य चांगले किंवा वाईट कधी नसते, पण ते संपादन करण्याचे मार्ग मात्र चांगले किंवा वाईट असतात. सज्जनाजवळ द्रव्य कमी असेल, पण त्याचे हृदय मात्र, मोजता येणार नाही इतक्या अफाट दैवी संपत्तीने भरलेले असते. दुर्जनाजवळ द्रव्य प्रचंड असले तरी त्याच्या हृदयात मात्र अंधारच दाटलेला असतो. त्याचा पैसा हलकट लोकांच्याच खिशात जातो. कडुनिंबाची फळे पिकली तरी ती खातात कावळेच! इतरांना त्या फळांचा उपयोग होत नाही. तशी दुष्टाची संपत्ती सज्जनांच्या आणि सन्मार्गाच्या उपयोगी पडत नाही. निंबोळ्यांचा उपयोग, पांढ-या कपड्यातील का असेना, पण कावळ्यांनाच होतो.
महाराष्ट्री प्राकृत गाथा १४
चावो सहवसरलं विच्छिवइ सरं गुणम्मि वि पडन्तम्।
वंकस्स उज्जुअस अ संबंधो किं चिरं होई?।
अर्थ : बाण स्वभावत: सरळ असतो (व धनुष्य वक्र असते). धनुष्याच्या दोरीवर बाण चढविला की ते बाणाला तात्काळ फेकून देते. सरळ व वक्र यांचा संबंध चिरकाल कसा टिकेल?
स्पष्टीकरण : धनुष्य आणि बाण या प्रतिमांतून मनुष्याचे स्वभावगुण सांगितले आहेत. काही माणसे बाणासारखी सरळ असतात तर काही धनुष्यासारखी वाकडी. धनुष्य आणि बाण एकत्र येतात, पण किती काळ? अगदी क्षणकालच. धनुष्यावर बाण चढवला रे चढवला की धनुष्य बाणाला दूर फेकून देते. त्याप्रमाणे वक्र म्हणजे कपटी माणसे सरळ स्वभावाच्या व्यक्तीला जवळ करतात आणि लगेच लांब फेकून देतात. म्हणून सरळ माणसाने कपटी माणसापासून सावध असले पाहिजे. धनुष्यासाठी उत्तम जातीचा बांबू वापरतात. दोन्ही टोकांना दोरी बांधल्यामुळे धनुष्य वक्र होते. वक्रतेत सौंदर्य असते. सखी या निमित्ताने नायिकेला सांगते की, ‘बाई ग, त्याचे रूप आणि शौर्य पाहून तू त्याच्यावर भाळलीस हे खरे. पण तो धनुष्यासारखा आहे. त्याचे गुण तुला ठाऊक नाहीत. तू बाणासारखी सरळ आहेस आणि तो धनुष्यासारखा वक्र. तो तुला जवळ करील आणि कार्यभाग साधताच दूर फेकून देईल. म्हणून त्याच्यापासून सावध राहा.'
महाराष्ट्री प्राकृत गाथा १५
तावमवणेइ ण तहा चन्दनपंको वि कामिमिहुणाणम्।
जह दूसरहे वि गिम्हे अण्णोण्णालिंगणसुहेल्ली।।
अर्थ : असह्य अशा ग्रीष्मातही प्रेमी जोडप्याचा ताप चंदनाच्या लेपाने नष्ट होत नाही. आलिंगनाच्या विलासामुळे प्राप्त होणा-या सुखानेच तो शांत होतो.
स्पष्टीकरण : प्रेमीजनांची बातच और. सर्वसामान्यांपेक्षा त्यांचे भावविश्व विलक्षण असते. सामान्यत: उन्हाळ्यात अंगाची काहिली होते. त्यावेळी दुस-याचा अंगस्पर्श ऊष्मौत्पादक आणि असह्य असतो. उष्णकाळात स्पर्शामुळे ताप वाढतो. कमी होत नाही. तो चंदनादी शीतलोपचारांनी कमी करावा लागतो. पण प्रेमाचे तंत्रच वेगळे. प्रेमाचा उद्भव मनस्तापाला कारणीभूत असतो आणि आलिंगन ऊष्मौत्पादक असते. तरीही प्रेमी जीवांना ते शीतल आणि सुखकारक वाटते. अगदी ज्ञानेश्वरांची विरहिणी देखील म्हणते- ‘न लवा चंदनु, न घाला विंझणवारा, तयाविण शून्य शेजारू गे माय।' - माझ्या अंगाला चंदन लावू नका की पंख्याने वारा घालू नका. त्यामुळे माझे अंग शीतल होत नाही. माझी शय्या सुनी पडली आहे. तेथे श्रीहरी असला तरच मला शीतलता लाभेल. अन्यथा नाही. हीच प्रेमाची रीत या गाथेत सांगितली आहे. आलिंगन ऊष्मौत्पादक असले तरी त्यामुळेच प्रेमीजनांच्या शरीराला शीतलता लाभते, त्यांचा ताप नष्ट होतो.
महाराष्ट्री प्राकृत गाथा १६
गअ, गंडअ, गवअ, सरभ, सेरिह, सद्दूल, रिक्ख जाईणं।
थणआ वाहवहूए अभअं दाउं व णिक्कंता।।
अर्थ : हत्ती, गेंडा, गवा, शरभ, (अष्टपद सिंह), सैरिभ (रानरेडा), शार्दूल व अस्वल या अरण्यातल्या श्वापदांना अभय देण्यासाठीच जणू व्याध स्त्रीचे स्तन पुढे सरसावले.
स्पष्टीकरण : स्त्रीच्या बहरात आलेल्या तारुण्याची महती गाथाकवींनी वेगवेगळ्या पद्धतीने गायिली आहे. व्याध स्त्री रंगाने काळी किंवा सावळी असेल, परंतु रानातल्या मोकळ्या वातावरणात निसर्गाने तिला मुक्त हस्ताने पुष्टयौवन बहाल केले आहे. तिची भरदार वक्षस्थळे हा तर तिच्या यौवनाचा मानबिंदूच. ती वयात आली अन् तिची छाती भरदार झाली. ती न्याहाळण्यात व्याध तरुण घटकान् घटका घालवू लागले. अरण्यात शिकारीला जाईनासे झाले. तिच्या भरदार वक्षस्थळाने असे तरुणांना वेड लावले. त्यांनी शिकार सोडून दिल्यामुळे अरण्यातल्या श्वापदांना जीवदान मिळाले, जणू काही श्वापदांना अभय देण्यासाठीच व्याध स्त्रीचे स्तन विशाल झाले, भरदार होऊन पुढे आले! तिच्या प्राप्तीसाठी एखाद्या वेळी कदाचित् पुरुषांचे प्राण जाण्याचा संभव आहे, परंतु तिच्यामुळे श्वापदांना मात्र प्राणदान मिळाले एवढे खरे.
महाराष्ट्री प्राकृत गाथा १७
उट्ठन्तमहारम्भे थणए ढट्ठूण मुद्धवहुआए।
औसण्णकवोलाए णीससिअं पढमघरिणीए।।
अर्थ : आरंभीच उठावदार असणारे नववधूचे स्तन पाहून खोल गाल गेलेल्या प्रथम गृहिणीने नि:श्वास सोडला.
स्पष्टीकरण : एका पुरुषाला अनेक स्त्रिया असत, अशा काळातली ही गाथा आहे. नववधू घरात आली की जुन्या पत्नीची मानखंडना ठरलेली. नवयौवना आणि व्यतीतयौवना यांच्यामध्ये फरक असणारच. नववधूकडे टवटवीत ताजे तारुण्य तर पहिल्या गृहिणीकडे पतितस्तन, ओघळून गेलेले यौवन. त्यामुळे नववधूचे उठावदार स्तन पाहिल्यावर खोल गाल गेलेल्या प्रथम गृहिणीने नि:श्वास सोडावा हे ओघानेच आले. ती नववधूचे सौंदर्य पाहून बावरली. तिला वाटले असावे की मुग्धावस्थेत एवढे सौंदर्य तर प्रौढावस्थेत ते किती वृद्धिंगत होईल! अजून कळी उमलली नाही तरी एवढी पुष्ट दिसते. हिला पुरुषाचा अंगसंग लाभला तर ही किती पाकळ्यांनी उमलेल कुणास ठाऊक! आपले गाल खोल गेलेले अन् हिच्या गालावर तर गुलाब फुललेले! आता यानंतर पतीच्या हृदयात हिलाच प्रथम स्थान मिळणार आणि यापुढे आपण केवळ गृहिणी म्हणून राहणार, या विचाराने तिने दीर्घ नि:श्वास सोडले.
महाराष्ट्री प्राकृत गाथा १८
रअणायरस्स साहेमि नम्मए! अज्ज मुक्कदक्खिण्णा।
वेडिसलयाहरंतेण मिलिया जं सि पूरेण।।
अर्थ : नर्मदे, शिष्टाचार बाजूला ठेवून मी आज रत्नाकराला भेटेन आणि पूर आला होता तेव्हा वेताच्या बेटात तू काय काय प्रेमचेष्टा केल्यास, ते सारे त्याला सांगेन.
स्पष्टीकरण : नायिका नर्मदेवर रागावलेली आहे. कारण नर्मदेला पूर आला आणि वेताच्या जाळीत तिचे पाणी घुसले. वेताच्या जाळीत प्रियकराला भेटायचा संकेत ठरलेला होता. पण नर्मदेने आगळीक करून संकेतस्थलच नष्ट केले. त्यामुळे प्रियकराची भेट नाही आणि काही नाही. म्हणून नायिका नर्मदेवर चिडली आहे. तिची तिच्या पतीजवळ- समुद्राजवळ चहाडी करायला ती निघाली आहे. परपुरुषासमोर जाऊ नये असा शिष्टांचा आचार आहे. परंतु हा आचार बाजूला ठेवण्याला ती प्रवृत्त झाली. एरवी मी तुझी कागाळी तुझ्या नव-याजवळ केली नसती, पण तू माझी आणि माझ्या प्रियकराची ताटातूट केलीस, म्हणून वेताच्या बेटात घुसून तू काय काय रंग उधळलेस, तिथल्या क्षुद्र खळखळत्या ओढ्यासोबत तू कशी रमलीस, हे मी तुझ्या नव-याला जाऊन सांगेन. ते नको असेल तर पुढे अशी आगळीक करू नकोस.
महाराष्ट्री प्राकृत गाथा १९
हतथफ्फंसेण जरग्गवी वि पण्हहइ दोहअणुणेण।
अवलोअणपण्हुइरिं पुत्तअ! पुण्णेहि पाविहिसि।।
अर्थ : धार काढणारा कुशल असला म्हणजे त्याच्या हाताचा नुसता स्पर्श झाला की म्हातारी गायसुद्धा पान्हावते. पुत्रा, नुसत्या दृष्टिक्षेपाने अनुरक्त होणारी स्त्री पुण्याईमुळेच प्राप्त होते.
स्पष्टीकरण : कोणतीही स्त्री सहजासहजी कोण्या पुरुषावर अनुरक्त होत नाही. ‘माझ्यावर प्रेम कर' असे कुणाला जबरदस्तीने सांगता येत नसते. सांगितले तरी उपयोगाचे नसते. परंतु हातात कौशल्य असले तर प्रेम न करणारी स्त्रीसुद्धा प्रेम करू लागते. हस्तकौशल्याने भाकड गायसुद्धा पान्हावते, त्याप्रमाणे अनुनय केला की प्रौढ स्त्री प्रसन्न होते. केवळ दृष्टिक्षेपाने स्त्री अनुरक्त होत नाही. परंतु नायिका तुला पाहताच पहिल्याच दृष्टिभेटीत तुझ्यावर अनुरक्त झाली आहे. तेव्हा तू किती भाग्यवान आहेस याचा विचार कर. म्हणून मुला, आता विचार करण्यात वेळ दवडू नकोस. घाई कर आणि ती ठरवेल त्या संकेतस्थळी जाऊन तिला भेट. तुझी ही पूर्वपुण्याई समज; असे दूती नायकाला सांगत आहे.
महाराष्ट्री प्राकृत गाथा २०
अज्जं मोहणसुहियं मुअत्ति मोत्तू पलाइए हलिए।
दरफुडिअवेण्टभारोणआइ हसिअं व फलहीए।।
अर्थ : मोहनसुखाने तृप्त झाल्यामुळे आर्येने डोळे मिटले. तेव्हा हलधराला (नांग-याला) वाटले की ती मेली. मधून तिला तेथे तशीच सोडून त्याने पळ काढला. नुकत्याच उमललेल्या बोंडाच्या भाराने लवलेली कपाशी हे दृश्य पाहून हसली.
स्पष्टीकरण : एक मजेशीर प्रसंग येथे उभा केला आहे. डोळे मिटणे, पळून जाणे आणि हसणे अशा विविध भावनांचे संमीलन येथे झाले आहे. सुरततृप्तीमुळे स्त्रियांंचे डोळे मिटतात, हा कामशास्त्राचा सिद्धान्त हलिकाला (नांगर चालवणा-याला) माहीत नव्हता. अनुभवानेही माहीत नव्हता. तिचे मिटलेले डोळे पाहून त्याला वाटले की ती मेली. त्याला वाटले की आपला आवेग हिच्या नाजूक देहाला कसा सहन होणार? आपला आवेग असह्य आहे असे प्रत्येक पुरुषाला उगाचच वाटत असते. आपल्यामुळे ही मेली अशी आपल्यावर तोहमत येऊ नये म्हणून तो पळून गेला. खराच अडाणी! थोडा वेळ थांबला असता तर त्याला समजले असते की एवढ्याने स्त्रिया गतप्राण होत नाहीत. तो पळालेला पाहून कपाशी मात्र स्वत:शीच हसली. कपाशी हीदेखील स्त्रीच. तिला स्त्रीचे रहस्य माहीत आहे. त्याच्या अडाणीपणाचे तिला हसू आले. कपाशी उमलेल्या बोंडाच्या भाराने लवलेली आहे, याचा अर्थ तिला देखील सुरतसुखाचा अनुभव आहे. म्हणूनच नांग-याचे अडाणीपण पाहून तिला हसू आले.
***
No comments:
Post a Comment