निवडक महाराष्ट्री प्राकृत गाथावरील 'गाथारती' हे माझे पुस्तक २००० साली प्रकाशित झाले.
रसिक वाचकांसाठी त्यातील गाथा क्रमश: येथे देणार आहे.
रसिकांनी त्यांचा आस्वाद घेऊन आपल्या प्रतिक्रिया नोंदवाव्यात.
महाराष्ट्री प्राकृत गाथा १
शिविणअलद्धपिअअमपुलइउग्गमणिब्भरेहि अंगेहि।
परिरम्भणे सुहाइं पावउ, मा णं पबोहेह॥
अर्थ ः ती स्वप्नात प्रियकराच्या आलिंगनाचे सुख अनुभवीत आहे. त्यामुळे तिची गात्रे पुलकित झाली आहेत. तिला कोणी जागे करू नका.
स्पष्टीकरण ः स्वप्नजगतावर माणसाचे नियंत्रण नसते हे खरे, परंतु स्वप्नात जे काही दिसते त्याचा परिणाम शरीरावर होतो हेही खरेच. या गाथेत एक नाजूक प्रसंग उभा केला आहे. नायिका स्वप्नात आपल्या प्रियकराला आलिंगन देत असावी. कारण अालिंगन देताना शरीरावर रोमांच उभे राहतात तसे रोमांच तिच्या शरीरावर फुललेले आहेत. आलिंगन देताना अवयवांची जशी हालचाल होते तशी तिच्या अवयवांची झालेली दिसत आहे. या खुणा जाणणारी तिची सखी दुस-या कोणाला सांगत असावी की, "बिचारीची झोप मोडू नका. आधीच ती विरहार्ता आहे. पती देशांतराला गेलेला. तिला स्वप्नात तो आलिंगन देत असेल तर ते सुख तिला भोगू दे. खोटे का असेना, पण तिला सुख मिळते आहे ते मिळू दे बिचारीला."
स्पष्टीकरण ः स्वप्नजगतावर माणसाचे नियंत्रण नसते हे खरे, परंतु स्वप्नात जे काही दिसते त्याचा परिणाम शरीरावर होतो हेही खरेच. या गाथेत एक नाजूक प्रसंग उभा केला आहे. नायिका स्वप्नात आपल्या प्रियकराला आलिंगन देत असावी. कारण अालिंगन देताना शरीरावर रोमांच उभे राहतात तसे रोमांच तिच्या शरीरावर फुललेले आहेत. आलिंगन देताना अवयवांची जशी हालचाल होते तशी तिच्या अवयवांची झालेली दिसत आहे. या खुणा जाणणारी तिची सखी दुस-या कोणाला सांगत असावी की, "बिचारीची झोप मोडू नका. आधीच ती विरहार्ता आहे. पती देशांतराला गेलेला. तिला स्वप्नात तो आलिंगन देत असेल तर ते सुख तिला भोगू दे. खोटे का असेना, पण तिला सुख मिळते आहे ते मिळू दे बिचारीला."
कालिदासाच्या 'मेघदूता'तला यक्षही मेघाला सांगतो- 'माझी प्रिया निद्राधीन असेल तर तिला उठवू नकोस. कदाचित ती स्वप्नात माझ्या आलिंगनाचे सुख अनुभवीत असेल! '
महाराष्ट्री प्राकृत गाथा २
गामंगणणिअडिअकह्णवक्ख वड! तुज्झ दूरमणुलग्गो।
तित्तिल्लपडिक्खकभोइओ वि गामो ण उव्विग्गो॥
अर्थ ः गावाच्या शिवेला वटवृक्ष दूरपर्यंत भिडलेला आहे. गावाच्या त्या बाजूला नेहमी जणू कृष्णपक्षच असतो. दक्ष पहारेकरी कामी जनांच्या पाळतीवर आहेत. तरीही हे वटवृक्षा, तुझ्या कृपेमुळे गावात कोणीही उद्विग्न नाही.
स्पष्टीकरण ः वटवृक्ष हे प्रेमी जनांचे संकेतस्थान आहे. त्याच्या डेरेदार सावलीत भर दुपारी सुद्धा अंधार दाटलेला असतो. त्याच्या विशाल खोडाच्या आडोशाला प्रेमीजनांना कार्यभाग साधता येतो. म्हणून ग्रामजीवनातल्या प्रेमिकांना वटवृक्षाचा मोठा आधार वाटतो. वडाचे हेच माहात्म्य या गाथेत गायिले आहे. एकतर वड हा गावापासून दूर गावशिवेवर आहे. तिकडे सहसा कोणी फिरकत नाही. त्या बाजूला कृष्णपक्ष असतो, म्हणजे अंधार असतो. ग्रामाधिका-याच्या आदेशावरून पहारेकरी डोळ्यांत तेल घालून पहारा करीत आहेत. प्रेमी जनांनी भेटू नये यासाठी ते जागरूक आहेत. तरी देखील वटवृक्षाची कृपा अशी की त्याच्या निबिड छायेत पहारेकऱ्यांची नजर चुकवून प्रेमचेष्टा चाललेल्याच आहेत. प्रेमलीलांना जणू वटवृक्षाचा आशीर्वाद आहे.
सांकेतिक अर्थ असा की, गावशिवेवरचा वड सुरक्षित अाहे, तेथे संकेत ठरला आहे, तेथे ये.
महाराष्ट्री प्राकृत गाथा ३
घरणीएॅ महाणसकम्मलग्गमसिमलिइएण हत्थेण।
छित्तं मुहं हसिज्जइ चन्दावत्थं गअं पइणा॥
अर्थ ः स्वयंपाक करीत असताना हाताची काजळी लागल्यामुळे गृहिणीचे मुख मलीन झाले होते. पण पतीने तिच्या मुखाला प्रेमाने हात लावताच ती हसली आणि तिचे प्रफुल्ल मुख चंद्रासारखे दिसू लागले.
स्पष्टीकरण ः स्पर्शाची जादूच मोठी विलक्षण. जे काळवंडलेले असते ते प्रेमस्पर्शाने लगेच उजळते. चुलीसमोर बसल्यावर हाताला काजळी लागणार आणि ती अनवधानाने मुखाला हात लावताना, केसाची बट मागे सारताना मुखचंद्रावरही उमटणार. चुलीसमोर बसूनही लक्ष मात्र 'त्याच्या'कडेच असते. तो येतो केव्हा अन् एखादे अधरचुंबन देऊन जातो केव्हा? किंवा कुशीत थरथरत्या बोटाने एखादा नाजूक चिमटा काढतो केव्हा? चूलखंड अन् स्वयंपाक तर नित्याचाच असतो. पण स्वयंपाकगृहातही अशा अवेळी चांदणे फुलू शकते. त्याची अशी प्रतीक्षा करणारी ही गृहिणी आहे. स्वयंपाक करते आहे, पण सारे लक्ष त्याच्याकडे आहे. चेह-याला काजळी लागलेली. एवढ्यात तो येतो आणि अतीव प्रेमाने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवतो. तेवढ्या स्पर्शानेही तिचे मुख पूर्ण विकसित कमळासारखे प्रफुल्लित होते अाणि चंद्रासारखे तेजोमय दिसू लागते. मग चंद्रावरचे डाग जसे सुंदर दिसतात तशी तिच्या मुखावरची काजळीही तिचे साैंदर्य वृद्धिंगत करते.
महाराष्ट्री प्राकृत गाथा ४
भरणमिअणील साहग्गखलिअचलणद्धविहुअवक्खउडा।
तरुसि हरेसु विहंगा कह कह वि लहन्ति संठाणम्।।
अर्थ : फळांच्या भाराने वाकलेल्या कृष्णवर्ण ओलसर फांद्यांच्या टोकावरून पायांची अग्रे घसरू लागली म्हणजे पक्षी पंख फडफडवून स्वत:ला सावरून धरतात आणि झाडांच्या शिखरांवर कष्टाने कसाबसा आधार मिळवितात.
स्पष्टीकरण : फळांचा भार, वाकलेल्या कृष्णवर्णाच्या नाजूक, ओलसर फांद्या आणि त्यावर तोल सावरणारे पक्षी यांचे सुरम्य चित्रण या गाथेत केलेले आहे. गाथाकवीच्या सूक्ष्म निरीक्षणशक्तीचा आणि सौंदर्यान्वेषी दृष्टीचा येथे प्रत्यय येतो. पक्ष्यांकडे एवढ्या सूक्ष्मदृष्टीने पाहिले तरच त्यांचे नाजूक पाय फांद्यावरून घसरताना दिसतात. फांद्या ओलसर असून फळभाराने त्या वाकत आहेत. त्यामुळे पक्ष्यांना तोल सावरणे अवघड होत आहे. म्हणून ते पंख फडफडवत तोल सावरून धरतात आणि ते अशक्य झालेच तर झाडाच्या शिखराचा आश्रय घेतात. पक्ष्यांचे अशा सूक्ष्म हालचालींसह चित्र कुण्या पक्षीवेड्याने आपल्या आधुनिक कॅमे-याने टिपलेले नाही, तर ते शब्दांच्या साहाय्याने दोन हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील कुणा प्राकृत गाथाकवीने टिपले आहे. त्याच्या सौंदर्यवेधी, सूक्ष्म दृष्टीला आणि नाजूक शब्दकळेला मनापासून दादच दिली पाहिजे. या सुंदर गाथेचा संकेतार्थ असा : संध्याकाळ झाली. त्या झाडाजवळ संकेत ठरविला आहे. लवकर तयार हो, अशी दूतीची नायिकेला सूचना. अथवा निर्धन, आधार द्यायला असमर्थ असलेल्या पुरुषाचा त्याग करून सधन, समर्थ पुरुषाचा आधार घे, अशी गणिकेला मातेची सूचना.
महाराष्ट्री प्राकृत गाथा ५
कहँ मे परिणइआले खलसंगो होहिइ त्ति चिन्तन्तो।
ओणअमुहो सूसओ सवइ व साली तुसारेण।।
अर्थ : साळीच्या लोंब्यांवरून दवाचे तुषार ठिबकत आहेत. परिणतावस्थेत आल्यानंतर दुष्टांची संगती भोगावी लागणार, या भीतीनेच जणू त्यांनी माना खाली घातल्या आहेत. त्यांच्या अंगांवर काटा आलेला आहे आणि त्या अश्रू ढाळीत आहेत.
स्पष्टीकरण : या गाथेत एक सौंदर्यक्षण टिपलेला आहे. खाली झुकलेल्या साळीच्या लोंब्या, त्यावरून ठिबकणारे दवाचे थेंब आणि लोंब्यावर असलेले काटे या सर्वांचे हे हृद्य चित्रण आहे. गाथाकवीने या निसर्गदृश्यावर मानवी भावनांचा आरोप केला आहे. लोंब्यांवरून दव का ठिबकत असावे? त्यांच्या अंगांवर काटा का आला असेल? त्यांच्या माना खाली का झुकल्या आहेत? तर परिपक्व झाल्यावर उखळ आणि मुसळ या दोन दुष्टांच्या तावडीत आपण सापडणार आहोत, या कल्पनेने त्यांची अशी अवस्था झाली. तारुण्यात पदार्पण करणाèया मुलींची मानसिक अवस्था अशीच असेल काय? ज्याच्याशी विवाह होणार तो दुर्जन असेल काय, या शंकेने त्या धास्तावत असतील? या निसर्गदृश्यातून मानवी भावना व्यक्त केल्या आहेत.
महाराष्ट्री प्राकृत गाथा ६
सरए महध्ददाणं अन्ते सिसिराइँ वाहिरुह्लाइं।
जाआऊँ कुविअसज्जणहिअअसरिच्छाइँ सालिलाइँ।।
अर्थ : शरदऋतूत मोठ्या सरोवराचे पाणी रागावलेल्या सज्जनांच्या हृदयाप्रमाणे बाहेरून उष्ण, पण आतून थंड असते.
स्पष्टीकरण : निसर्गनिरीक्षण आणि मानवी स्वभावाचा अभ्यास यांचा समन्वय येथे झालेला आहे. हिवाळ्यात मोठे सरोवर कसे असते? बाहेरून उष्ण पण आत थंड. सरोवर जणू रागावलेले असते. मनुष्य रागावला की उष्ण नि:श्वास टाकतो, त्याप्रमाणे सरोवरावरही वाफा दाटलेल्या असतात. जणू ते रागावून उष्ण नि:श्वास सोडत असते. परंतु गाथाकवीला सरोवराविषयी सांगायचे नसून सज्जन माणसाविषयी सांगायचे आहे. सज्जन मनुष्य वरवर रागावलेला दिसतो, पण त्याचे हृदय मात्र खरोखर शीतल असते. शरदऋतूतल्या मोठ्या सरोवरासारखी त्याची स्थिती असते. बाहेरून पाहावे तर वाफा दिसतात पण आत शिरल्यावर मात्र गारपणा अनुभवास येतो. सज्जनांच्या स्वभावावर येथे प्रकाश टाकलेला असला तर नायिका मध्यान्ह समयी सरोवराच्या काठी तुझी वाट पहात बसली आहे, अशी दूतीने नायकाला दिलेली ही सूचना असावी.
महाराष्ट्री प्राकृत गाथा ७
तह अडअणाए रुण्णं पइमरणे बाहरूद्धकष्ठी।
अणुमरणसंकिनो जह जारस्स वि संकिअं हिअअं।।
अर्थ : नवरा मेला तेव्हा असतीने रुद्ध कंठाने एवढा आक्रोश केला की दु:खाने ही मरते की काय? अशी तिच्या जारालाही धास्ती वाटली.
स्पष्टीकरण : मनुष्यस्वभावाचा हा एक खास नमुना. स्वैरिणीचे नव-यावर अजिबात प्रेम नसते. परंतु तिच्याएवढे प्रेम व्यक्त करणे, प्रेमाचे नाटक करणे सतीलाही साधत नाही. ‘सासूसाठी रडे सून। भाव अंतरीचा भिन्न' असे तुकारामांनी म्हटले आहे. सासू मेली की सून मोठ्याने गळा काढते. एवढ्या मोठ्याने की पाहणा-याला वाटते की हिला फारच दु:ख झाले आहे. परंतु तिची भावना मात्र वेगळी असते- बरे झाले कटकट गेली! अशीच गंमत या गाथेत वर्णन केलेली दिसते. नवरा मेल्यावर व्यभिचारिणीने मोठा आक्रोश केला. तो एवढा मोठा होता की, ज्याला, हिचे नव-यावर अजिबात प्रेम नव्हते हे माहीत आहे, अशा तिच्या जाराला देखील ही दु:खामुळे मरते की काय, अशी धास्ती वाटली! यावरून तिचे रडण्याचे नाटक किती जबरदस्त असले पाहिजे, याची कल्पना येते. पतिव्रता स्त्री कदाचित् पतीचे निधन झाल्यावर मुळूमुळू रडत बसेल. पण या बहाद्दर स्त्रीने मात्र आपल्या नाटकी प्रेमाचे प्रभावीरित्या प्रदर्शन केले आहे.
महाराष्ट्री प्राकृत गाथा ८
कोत्थ जअम्मि समत्थो थइउं वित्थिण्णणिम्मलुत्तुंगम्।
हिअअं तुज्झ, णराहिव! गअणं च पओपरं मोत्तुम्।।
हिअअं तुज्झ, णराहिव! गअणं च पओपरं मोत्तुम्।।
अर्थ : राजा, तुझे हृदय आकाशासारखे विस्तीर्ण, निर्मल आणि उत्तुंग आहे. ते व्यापण्याचे सामर्थ्य पयोधरांशिवाय जगात कोणाला आहे?
स्पष्टीकरण : पयोधर म्हणजे ढग आणि स्तन. स्वच्छ, निळे आकाश ढगांनी व्यापले जाते. नभ मेघांनी आक्रमिले जाते. त्याप्रमाणे कोणत्याही पुरुषाचे विशाल हृदय केवळ स्तनच व्यापून टाकू शकतात. स्त्रीने आलिंगन दिले की पुरुषाचे विशाल हृदय व्यापले जाते आणि तिचे विशाल स्तन पुरुषाच्या हृदयात घर करतात. या अर्थानेही तिच्या स्तनांत हृदय व्यापण्याचे सामर्थ्य आहे. या गाथेत कुणी गणिकामाता विलासी राजासमोर आपल्या कन्येची भलावण करीत असावी, असे वाटते. हृदय हे आकाशापेक्षाही व्यापक असते. परंतु आलिंगन देऊन किंवा हृदयात घर करून त्याला व्यापण्याचे सामर्थ्य स्त्रीच्या स्तनमंडळात असते. म्हणून स्तन हे सर्वव्यापक आहेत, असा अर्थ. तपस्वी संन्यासी देखील विशाल स्तन पाहिले की बावचळून जातात, आपली तपस्या विसरतात. आकाश कितीही निर्मल असले तरी ते ढगांनी झाकोळून जाते तसे निर्मलहृदयी मनुष्याला देखील वेड लावण्याचे बळ स्त्रीच्या स्तनांत असते. म्हणून स्त्रीचे स्तन हे विशाल हृदयापेक्षाही अधिक विशाल असतात.
महाराष्ट्री प्राकृत गाथा ९
अत्ता! तह रमणिज्जं अह्मं गामस्स मण्डेणीहूअम्।
लुअतिलवाडिसरिच्छं सिसिरेण कअं भिसिणिसण्डम्।।
अर्थ : आत्याबाई, आपल्या गावाला शोभा देणा-या रमणीय तळ्यातील कमळांची थंडीने कोण दुर्दशा केली आहे. (ती पाहिलीत का)? तिळाचे सुंदर पीक कापल्यावर नुसते बुडखे राहतात ना, तसे तळ्यात आता कमळांचे दांडे मात्र राहिले आहेत.
स्पष्टीकरण : कमळफुले खुडून नेल्यामुळे किंवा थंडीने झडून गेल्यामुळे तळ्यात कमळांची पाने आणि त्यांचे दांडे मात्र उरलेले आहेत. त्या तळ्याचे सुरेख चित्रण या गाथेत केले आहे. त्याला उपमा दिली आहेत ती तिळाचे पीक कापल्यावर उरलेल्या बुडख्यांची. तळे आणि शेत यांच्यामधील असे साम्य सूक्ष्म दृष्टीने टिपलेले आहे. कमळे नसलेले, पण ज्याच्या पाण्यावर कमळांची पाने तरंगताहेत, कमळांचे दांडे वर आले आहेत, असे एक कमळतळे दृष्टीपुढे उभे राहते. गाथाकवीच्या चित्रमयी शैलीचा येथे प्रत्यय येतो. एक निसर्गदृश्य टिपणा-या या गाथेतही सांकेतिक अर्थ शोधला गेला. हिवाळ्यातल्या थंडीने कमळे करपून गेळ्यामुळे आता त्या बाजूला कोणी फिरकणार नाही, म्हणून तेथे एकांत मिळेल, अशी सासूबाईच्या समोर प्रियकराला नायिका सूचित करीत आहे. सासूच्या देखत सुनेने यापेक्षा अधिक किती स्पष्ट बोलावे?
महाराष्ट्री प्राकृत गाथा १०
पाअपडिअस्स पइणो पुट्ठिं पुत्ते समारुहत्तम्मि।
दढमण्णु दुण्णिआएॅ वि हासो घरिणीएॅ णेक्कन्तो।।
अर्थ : क्रूद्ध गृहस्वामिनीच्या पाया पडणा-या पतीच्या पाठीवर पुत्र बसला. पत्नी अतिशय रागात होती. तरी हे दृश्य पाहून ती खुदकन् हसली.
स्पष्टीकरण : घरोघरी दृष्टीस पडणारा हा प्रसंग या गाथेत विनोदी होऊन आला आहे. पुरुष कितीही कर्तृत्ववान आणि करारी असला तरी तो घराबाहेर. घरात त्याला आपल्या लहान मुलापुढे घोडा व्हावेच लागते. असाच मुलाला पाठीवर घेऊन हातापायावर रांगणारा बाप या गाथेत दिसतो. पण या प्रसंगात विनोदी छटा भरली आहे ती रागावलेल्या गृहिणीने. ती पतीवर भयंकर संतापलेली आहे. त्याच्या अपराधाला आता क्षमा करायची नाही, हे तिने निश्चित केले आहे. अपराध नेहमीचाच. इकडे मजा मारायचीच, पण दुसरीकडेही सूत जुळवलेले. मग हिला राग का येणार नाही? तो बिचारा गुडघे टेकवून हिच्या पाया पडतोय. हिचा अनुनय करतोय, तेवढ्यात तिचे लहान मूल त्याच्या पाठीवर जाऊन बसले अन् ‘चल माझ्या घोड्या' म्हणत हाकायला लागले तर तिला (कितीही रागात असली तरी) हसू येणार नाही तर काय? तिचा संताप जर हास्यात परिवर्तित होत असेल तर पतीलाही मुलाचा घोडा बनण्यात काय वावगे वाटणार? एकूण ती खूष होणे महत्त्वाचे. खजिना तिच्याशिवाय दुसरा कोण खुला करणार?

No comments:
Post a Comment