Wednesday, 13 September 2017

महाराष्ट्री प्राकृत गाथा 21-30

महाराष्ट्री प्राकृत गाथा २१

वाउद्धअसिचअविहाविओरुदिट्ठेण दन्तमग्गेण।
वहुॅमाआ तोसिज्जइ णिहाणकलसस्स व मुहेण।।

अर्थ : वधूच्या मांडीवर दंतव्रण होते. वा-याच्या झोताने तिचे वस्त्र उडाले तेव्हा ते तिच्या आईला दिसले. गुप्तधनाच्या कळशीचे तोंड दिसले म्हणजे होतो तसा आनंद तिला ते व्रण पाहून झाला.
स्पष्टीकरण : मुलीचे सौभाग्य आणि सद्भाग्य आईला अतिशय प्रिय असते. सौभाग्य आणि सद्भाग्य हातात हात घालून जोडीने चालतातच असे नाही. ब-याचदा स्त्री सौभाग्यवती असते, पण सद्भाग्यवती नसते. पतीचे प्रेम नसेल तर कपाळावरच्या कुंकवाच्या टिळ्याला काय अर्थ असतो? या गाथेतली वधू मात्र सौभाग्याबरोबरच सद्भाग्यवतीही आहे. तिच्या सद्भाग्याची निशाणी तिच्या मांडीवर दंतव्रणांच्या रूपात नोंदलेली आहे. ती पाहून आईला अत्यानंद होतो. आपल्या जावयाला मुलीने वेड लावले आहे आणि जामाताच्या नैपुण्याची निशाणी तिच्या मांडीवर उपस्थित आहे, हे पाहून आईला स्वाभाविकपणे अत्यानंद झाला. तोही कसा? तर गुप्तधनाच्या कळशीचे तोंड दिसल्यावर होतो तसा. सहसा दृष्टीला न पडणारे दंतव्रण आणि गुप्तधनाची कळशी यांच्यातील साम्य लक्षणीय आहे.

महाराष्ट्री प्राकृत गाथा २२

अज्ज कइमो वि द्रिअहो वाहवहु रुवजी व्वणु म्मत्ता।
सोहग्गं धणुरुम्पच्छलेण रच्छासु विक्किरइ।।

अर्थ : आज काही दिवस झाले. रूपयौवनोन्मत्त व्याध स्त्री नव-याचे धनुष्य तासून त्याच्या छिलप्या रस्त्यात विखरीत आहे. जणू या मिषाने ती आपले सौभाग्यच प्रकट करीत आहे.
स्पष्टीकरण : व्याध स्त्रीने नव-याचे धनुष्य जाहीरपणे तासणे हे दृश्य मोठे अर्थपूर्ण आहे. एक तर ती रूपयौवनोन्मत्त आहे. जो पुरुष तिच्या मुठीत किंवा मिठीत सापडेल तो तिच्यात आयुष्यभर गुंतून पडेल. ती अशी पुष्टयौवना आहे. गाथाकवी सांगतो की, काही दिवसांपासून ती रस्त्यावर बसून नव-याचे धनुष्य तासून त्याच्या छिलप्या विखरत असते. असे करून ती आपले सौभाग्यच प्रकट करीत आहे. तिचा पती तिच्यावर अत्यंत आसक्त आहे. तिच्या प्रेमचेष्टांत रममाण झाल्यामुळे तो दिवसेंदिवस दुबळा होत चालला. त्याला आधीचे जाड धनुष्य पेलेनासे झाले. म्हणून ही व्याध स्त्री त्याचे धनुष्य तासून हलके करीत आहे. तिने त्याला अत्यंत वेड लावले, असा याचा अर्थ होतो. रस्त्यात धनुष्य तासून ती ही गोष्ट सर्वांसमोर जाहीर करीत आहे. एखादा उन्मत्त धनिक जसा रस्त्यावर द्रव्य उधळतो तशी ही रूपयौवनोन्मत्त स्त्री आपले सद्भाग्य अशा प्रकारे रस्त्यावर उधळत आहे. स्त्रीवर अतिआसक्त झालेल्या पुरुषाच्या अवस्थेचे चित्रण येथे केले आहे. याशिवाय नायिका असाध्य आहे, अशी सूचनाही येथे असावी.

महाराष्ट्री प्राकृत गाथा २३

पुसइ खणं, धुवइ खणं पफ्फोडइ तक्खणं अआणन्ती।
मुद्धवहू थणवट्टे दिण्णं दइएण णहरअम।।

अर्थ : मुग्ध वधूच्या स्तनांच्या पृष्ठभागावर प्रियकराने नखक्षते उमटविली. त्या अजाणतीने ती क्षणभर वस्त्राने पुसली, टिचकीने झटकली, पाण्याने धुतली. पण व्यर्थ!
स्पष्टीकरण : गाढ प्रेम आणि धसमुसळी क्रीडा यांची चिन्हे अंगांवर उमटणारच! नायिका मुग्ध आहे. म्हणजे अननुभवी, अजाणती आहे. प्रियकराने स्तनांवर उमटविलेले नखांचे ठसे सहजासहजी पुसले जात नाहीत याची बिचारीला कल्पना नाही. टिचकीसरसे प्रेम झटकून टाकता येत नसते. तशीच प्रेमचिन्हे देखील झटकून टाकता येत नाहीत. पण ही वेडाबाई ती पुसण्याचा प्रयास मात्र करते आहे. आधी वस्त्राने पुसून पाहिली तरी ती पुसली गेली नाहीत. मग टिचकीने झटकून पाहिली तरी ती जागेवरच राहिली. शेवटी पाण्याने धुतली तरी उपयोग झाला नाही. प्रियतमाचे प्रेम असेच व्रणासारखे तनात आणि मनात रुतून बसते, भळभळत राहते. त्यात वेदना असते पण ती हवीहवीशी वाटते. अंगावरची प्रेमचिन्हे कदाचित कालांतराने नाहीशी होतीलही, परंतु मनावर उमटलेली प्रेमचिन्हे मात्र जन्मभर सोबत करतात. स्तनांवरील नखक्षते झटकून पाहणा-या नायिकेचे मुग्धपण मात्र रसिकांच्या मनात दरवळत राहावे असेच आहे.

महाराष्ट्री प्राकृत गाथा २४

फलसंपत्तीअ समोणआइँ तुंगाइँ फलविपत्तीए।
हिअआइ सुपुरिसाणं महातरूणं व सिहराइं।।

अर्थ : मोठ्या झाडांच्या फांद्यांप्रमाणे मोठी माणसे संपन्न झाली की नम्र होतात आणि विपत्काळी उन्नत होतात.
स्पष्टीकरण : हे एक सुरेख सुभाषित आहे. सुजनांची वृत्ती येथे स्पष्ट केली आहे. सज्जनांची तुलना वृक्षाबरोबर केली आहे. महावृक्षाच्या फांद्या फळभाराने लहडल्या की खाली झुकतात. विनीत होतात आणि फळांचा बहर संपला की उन्नत होतात. त्याप्रमाणे सज्जन माणसे सुखसमृद्धीच्या काळात नम्र होतात आणि समृद्धी संपल्यावर, विपत्काल आल्यावर ताठ होतात. संकटकाळात ताठ मानेने जगतात. याउलट सामान्यांचे वर्तन असते. वैभव प्राप्त झाले की माणसे उन्मत्त होतात आणि ते सरले की लाचार होतात. सुजन मात्र या दोन्ही काळांत आपले वेगळेपण वरील प्रकारे दाखवून देतात.
या सुभाषितवजा गाथेत देखील काही जाणकारांना सांकेतिक अर्थ दिसतो. त्यांच्या मते, गणिकेकडे येणा-या, धन नष्ट झालेल्या नायकाला उत्साहित करण्यासाठी गणिकेच्या मातेने हे उद्गार काढलेले असावेत. हे मान्य केले तरी या गाथेचा सरलार्थ मात्र सुजनांच्या कुसुमकोमल आणि वज्रकठोर व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकतो.

महाराष्ट्री प्राकृत गाथा २५

वइविवरणिग्गअदलो एरण्डो साहइ व्व तरुणाणम्।
एत्थ घरे हलिअवहू एद्दहमेत्तत्थणी वसइ।।

अर्थ : कुंपणाच्या छिद्रांतून बाहेर डोकावणारी एरंडाची पाने तरुणांना जाहीर करतात की त्या पानांएवढे विशाल स्तन असलेली शेतक-याची तरुण स्त्री येथे राहते.
स्पष्टीकरण : तिच्या- म्हणजे नायिकेच्या घराचा नक्की पत्ता दूती नायकाला समजावून सांगत आहे. पत्ता सांगताना घराजवळची अथवा घरातली एखादी खूण सांगावी लागते. या गाथेतील चतुर दूतीने खूण तर सांगितलीच, पण त्याबरोबर नायिकेचे वैशिष्ट्यही सांगितले. भरदार वक्षस्थळे हेच तिचे वैशिष्ट्य. शेतक-याची तरुण पत्नी लग्नानंतर गावात आली आणि तिला पाहून गावातल्या खुशालचेंडू तरुणांना चळ सुटला. तरुण पोरे दिवाणी झाली. तिच्यावर नजर ठेवणारा असाच कुणीतरी तरुण हा येथला नायक असावा किंवा तिच्या यौवनाची कीर्ती ऐकून आलेला कुणी परगावातला नवखाही असावा. त्याने दूतीला गाठून ‘ती कुठे राहते?' असे विचारले. मग तिने हे उत्तर दिले. तिचा पत्ता विचारायला कशाला हवा? हा असा या रस्त्याने पुढे गेलास की ज्या कुंपणातून एरंडाची पाने बाहेर डोकावताना दिसतील तेच तिचे घर. बाहेर डोकावणारा एरंड घरधनिणीच्या भरदार सौंदर्याकडे येणा-या जाणा-याचे लक्ष वेधतो आहे. एरंड हा खल आहे. त्याच्या तोंडी रहस्य कसे ते राहतच नाही. म्हणून तो पानांच्या रूपाने बाहेर डोकावून आपल्या मालकिणीच्या पुष्ट वक्षस्थळाची द्वाही फिरवीत आहे.

महाराष्ट्री प्राकृत गाथा २६

तिसिया पियउ त्ति मओ, मओ वि तिसिओ मई करेऊण।
इय मयमिहुणं तिसियं पियइ ण सलिलं सिणेहेण!

अर्थ : मृगाला वाटते की मृगी अधिक तृषित आहे. तिने अगोदर पाणी प्यावे आणि तिला वाटते की तोच अधिक तृषार्त आहे. त्यानेच अगोदर पाणी प्यावे. म्हणून एकमेकांवरील प्रेमामुळे दोघेही पाणी प्याले नाहीत.
स्पष्टीकरण : हरीण आणि हरिणी यांच्या परस्परप्रीतीचे चित्र या गाथेत रेखाटले आहे. मानवांना जशा भावना असतात तशा पशूंनाही असतात, याचा अनुभव आपण अनेकदा घेत असतो. पशूंमधील प्रेम गाथाकवीने नेमके टिपले आहे. हरीण आणि हरिणी दोघेही तृषार्त आहेत. पाणवठ्यावर आल्यावर हरिणाला वाटते की तिने आधी पाणी प्यावे आणि तिला वाटते की हरिणाने आधी पाणी प्यावे. प्रत्येकाला आपल्यापेक्षा दुसरा अधिक तृषार्त आहे असे वाटते. म्हणून हा ‘पहले आप' सारखा मामला. परंतु हे खरेच हरीण-हरिणीचे चित्र आहे की बरेच दिवस रतिसुखापासून वंचित असलेल्या नायक-नायिकेचे चित्र आहे? दोघेही उपाशी. मग आरंभ कोणी करायचा? आपण उतावळे नाही हे एकमेकांना दर्शविण्याची तर ही धडपड नसावी? पण यामुळे दोन धगधगणारी शरीरे जवळ असूनही ती तहानलेली राहण्याचीच शक्यता अधिक.

महाराष्ट्री प्राकृत गाथा २७

चोराणँ, कामुआणँ अ पामरपहिआणँ कुक्कुडो वअइ।
रे रमह, वहह, वाहवह, एत्थ, तणुआअए रअणी।।

अर्थ : चोर, कामुक आणि गरीब वाटसरू यांना पहाटे कोंबडा आरवूून सांगतो की अरे, आता (चोरीचा माल) पळवा, (प्रेम) आवरते घ्या आणि (ओझ्याची जनावरे) हाका. कारण रात्र क्षीण होत आहे.
स्पष्टीकरण : पहाटे कोंबडा आरवला की घराघराला जाग फुटते. ग्रामजीवनात पहाटेचे कोंबड्याशी नाते जुळलेले असते. कोंबडा आरवला की पहाट झाली असे समजावे. आता तांबडे फुटणार, पूर्वक्षितिजावर रंगोत्सव खेळला जाणार आणि सर्व जगराहाटी सुरू होणार. रात्रीची स्वप्ने धूसर होऊन वास्तवाला सामोरे जावे लागणार. निशाचरांना आपले इंद्रजाल आवरण्याचा हा इशाराच. कोंबडा आरवून कोणाकोणाला काय सांगतो? चोरांना सांगतो- 'पळवा, चोरीचा माल पळवा.' प्रेमीजनांना सांगतो- 'आवरते घ्या, तुमचे प्रेम आवरते घ्या.' वाटसरूंना सांगतो- 'हाका, तुमची जनावरे हाका. दिवस उगवत आहे. आता नवा गाव गाठायची तयारी करा.' कोंबड्याच्या एका आरवण्यात एवढे अर्थ भरलेले आहेत. जो तो आपल्या कुवतीप्रमाणे त्याचा अर्थ लावतो. देव, दानव आणि मानव यांना प्रजापतीने ‘द' हा एकाक्षरी उपदेश केल्याची कथा उपनिषदांत आहे. देवांसाठी ‘द' म्हणजे दमन. देव सुखोपभोगी, म्हणून त्याच्यासाठी इंद्रियदमन हा अर्थ. दानवांसाठी ‘द' म्हणजे दया. दानव निष्ठुरहृदयी म्हणून त्यांना ‘दया करा' हा उपदेश. मानवासाठी ‘द' म्हणजे दत्त. द्या, दान करा. मानव स्वार्थी, म्हणून त्याने दान करून नि:स्वार्थी व्हावे ही अपेक्षा. एका ‘द' या अक्षराचे तिघांसाठी वेगळे अर्थ, तसे कोंबड्याच्या आरवण्याचे प्रत्येकासाठी वेगळे अर्थ आहेत.

महाराष्ट्री प्राकृत गाथा २८

कं तुंगथणुक्खित्तेण पुत्ति! दारट्ठिआ पलोएसि!
उण्णामिअकलसणिवेसिअग्धकमलेण व मुहेण।।

अर्थ : मुली, उंच कलशावर पूजेचे कमळ ठेवावे त्याप्रमाणे उभार उरोजावर मुख ठेवून, दारात उभी राहून तू कोणाची वाट पहात आहेस?
स्पष्टीकरण : दारात उभी राहून वाट पाहणारी स्त्री या गाथेचा विषय आहे. तिचे मुख टपो-या, नाजूक कमळासारखे आहे. म्हणून ती कमलमुखी. तिचे पुष्ट उरोज कलशासारखे आहेत. दोन घवघवीत पूर्ण आकार, प्रियकराच्या हातांना बोलते करणारे. उंच कलशावर पूजेचे कमळ ठेवावे तशी ती आपल्या उभार उरोजावर मुख ठेवून दारात उभी आहे. 'कोणाची वाट पाहतेस अशी?' असा दूतीचा प्रश्न. दारात उभी राहणारी स्त्री सहजसाध्य असते, असे कामशास्त्र सांगते. ती अशी सहजच उभी राहिली असेल, पण त्यामुळे दूतीला मात्र वाटले की ती कोणाची तरी वाट पहात असावी. मग- त्याचे नाव सांग, मी घेऊन येते किंवा कोणाकडेही यायला तयार असलीस तर तसे सांग, घेऊन जाते- असा दूतीच्या प्रश्नामागचा गर्भितार्थ आहे.
हा गर्भितार्थ बाजूला ठेवला तरी एका सौंदर्यवतीचे दाराशी ओठंगून उभे राहणे मोठे लोभसवाणे आहे. कमळ आणि कलश तिच्या सौंदर्याची आणि पुष्टतेची साक्ष देणा-या प्रतिमा आहेत. ‘पूजेचे कमळ' म्हटल्यामुळे तिच्या भरदार लावण्याला पावित्र्याची किनार लाभली आहे.

महाराष्ट्री प्राकृत गाथा २९

कहँ णाम तीअ तह सो सहवगुरुओ वि थणहरो पडिओ।
अहवा महिलाणें चिरं को वि ण हिअआम्मि संठाइ।।

अर्थ : स्वभावत: भरदार आणि विशाल अशा तिच्या स्तनांचे अध:पतन कसे झाले? खरोखर, स्त्रियांच्या हृदयात काहीही चिरकाल राहू शकत नाही.
स्पष्टीकरण : उन्नत उरोज हे स्त्रीसौंदर्यांचे लक्षण आहे. तिच्या यौवनाचा आणि सौंदर्याचा गौरव करण्यासाठी निसर्गाने स्तनांना उच्च स्थान आणि उत्तुंग स्थिती बहाल केली आहे. स्तनांचा भरदारपणा जेवढा नैसर्गिक तेवढेच प्रजोत्पादनानंतर त्याचे होणारे अध:पतनही नैसर्गिक. स्तनांच्या बाह्यरूपातील बदलाचे उदाहरण देऊन स्त्रीच्या चंचल हृदयाकडे ही गाथा लक्ष वेधते. बहिरंगावरून अंतरंगाचे निदान करते. ज्याच्या उबेत पुरुषांचे तारुण्य पालवते, रसिकता बहरते, असे भरदार आणि विशाल स्तन पुढे गलित का बरे होत असतील? असा प्रश्न गाथाकवीला पडलेला आहे. त्याच्यापुरते त्याने उत्तर शोधले आहे. स्त्रियांच्या हृदयात चिरकाल असे काहीही राहत नाही, म्हणून तिच्या उरोजांची अशी स्थिती झाली. कोणतेही रहस्य तिच्या हृदयात कायम राहत नाही. ते बाहेर पडतेच. ती दाखवत नसली तरी, तिच्या हृदयातले प्रेमही चिरकाल टिकणारे नसते. जे चंचल ते उच्च कसे असणार? जे चंचल असते त्याचे स्थानांतर होणारच. म्हणून उत्तुंग स्थानावरून स्तनांचे अध:पतन होते, असा अर्थ.

महाराष्ट्री प्राकृत गाथा ३०

खिप्पइ हारो थणमण्डलाहि तरुणीअ रमणपरिरम्भे।
अच्चिअगुणा वि गुणिनो लहन्ति लहुअत्तणं कलि।।

अर्थ : प्रियकराला आलिंगन देण्यासाठी सज्ज होताना तरुणी हार इत्यादी अलंकार स्तनमंडलावरून काढून ठेवतात. सद्गुणांमुळे जे पूज्य असतात अशांनाही कालप्रभावामुळे लघुत्व प्राप्त होते.
स्पष्टीकरण : आलिंगन हा सुरत-नाटकाचा पूर्वरंग होय. शरीरस्पर्शाने आणि अंगगंधाने भावना उत्तेजित होते. पुढील सर्व नाट्यात रंग भरतो तो पूर्वरंगामुळे. म्हणून पूर्वरंग महत्त्वाचा. त्याच्याशिवाय नाटक रंगत नाही आणि ब-याचदा ती यांत्रिक क्रिया मात्र ठरते. अलंकारामुळे सौंदर्य वृद्धिंगत होते हे खरे असले तरी दोन शरीरे जेव्हा कडकडून भेटतात तेव्हा अलंकार हे अडसर ठरतात. स्पर्शाला स्पर्शाशीच बोलता येते. मात्र हा स्पर्श जिवंत हवा. अलंकारांचा मृतस्पर्श नको. म्हणून प्रियकराला आलिंगन देताना तरुणी आपल्या वक्षस्थलावर रुळणारे अलंकार काढून ठेवतात. मग आपले भरदार उरोज त्याच्या छातीवर निस्संकोचपणे घुसळता येतात, अलंकार कितीही मूल्यवान असला तरी त्याचा निर्जीव स्पर्श दोन रसरसलेल्या जिवंत देहांत अडसर ठरतो. अलंकार काढून ठेवल्यावर मात्र तो अडसर ठरत नाही. सद्गुण हे पूजनीय असले तरी काही प्रसंगी ते उपयोगी ठरत नाहीत. विरक्तपणा हा सद्गुण खरा, पण संसारात त्याचा किती उपयोग होतो? म्हणून प्रसंगी सद्गुणांनाही लहानपण द्यावे लागते. त्याप्रमाणे एरव्ही सौंदर्य वृद्धिंगत करणा-या अलंकारांनाही काही विशेष प्रसंगी काढून ठेवावे लागते, असा या गाथेचा आशय.

Sunday, 3 September 2017

गाथारती

महाराष्ट्री प्राकृत गाथा ११

 मरगअसूईविद्धं व मोत्तिअं पिअइ आअअग्गीओ। 
मोरो पाउसआले तणग्गलग्गं उअअबिंदुम्।। 

 अर्थ : पावसाळ्यात गवताच्या टोकावर लटकणारा व पाचूच्या सुईने विद्ध झालेल्या मोत्याप्रमाणे दिसणारा पावसाचा थेंब - पाण्याचा थेंब मोर मान उंच करून चोचीने टिपून घेत आहे. 

स्पष्टीकरण : मोराचे असे पाऊसथेंब टिपणे अत्यंत मनोहर आहे, यात शंका नाही. गाथाकवीचे सूक्ष्मातिसूक्ष्म निरीक्षण आणि अप्रतिम वर्णनशैली यांचे येथे दर्शन घडते. गवताचे अग्र, त्यावर लटकलेला पावसाचा थेंब, थेंबातून दिसणारे गवताचे अग्र. निरीक्षण आणि कल्पनारम्यता यांचे अद्भुत मिश्रण येथे पाहायला मिळते. या सुरेख दृश्याच्या पार्श्वभूमीवर देखणा मोर उभा केला आहे. तो केवळ उभा नाही तर त्या थेंबाला मोती समजून, मान उंच करून टिपून घेत आहे. मोराचा सर्व डौलदारपणा इथे प्रकट झाला आहे. मोत्याचा चारा हे खरे तर राजहंसाचे खाद्य. परंतु या ठिकाणी वास्तवतेला धक्का न लावता मोर उभा केला आहे. गवताचे हिरवेपण, थेंबातून पाझरणारा सूर्यप्रकाश आणि मोराचे थेंब टिपणे हे एखादा कॅमेरामन आपल्या अत्याधुनिक कॅम-याने टिपूही शकेल. परंतु गाथाकवीच्या निसर्गदत्त दृष्टीने टिपलेले हे दृश्य औरच.

महाराष्ट्री प्राकृत गाथा १२ 

पिसुणन्ति कामिणीवं जल लुक्कपिआवऊहण सुहेल्लिम्। 
कण्डइ अकलोलुष्फुल्लणिच्चलच्छीइँ व अणाइँ।। 

 अर्थ : जलक्रीडा करणा-या कामिनीच्या कपोलांवर काटा आलेला आहे. तिची नजर निश्चल आहे. मुद्रा प्रफुल्ल आहे. तिच्या प्रियकराने पाण्यात डुबी घेऊन घेतलेल्या आलिंगनामुळे तिला होणारे सुख या चिन्हांवरून सूचित होते. 

 स्पष्टीकरण : जलक्रीडा करण्यात केवढा आनंद असतो! त्यातही प्रियकराची संगत असेल तर मग आनंदाला सीमाच नसते. एखादे वेळी उदासीन प्रियतमाला ‘यमुनाजळी खेळू खेळ कन्हैया' अशी सादही घातली जाते. गार पाण्याच्या लाटांनी शरीरावर आधीच काटा फुललेला असतो. त्यात प्रियकराचा स्पर्श झाला की मग विचारायलाच नको. पाण्यात बुडी घेऊन गाढ आलिंगनाचे सुख मिळत असेल तर ते कुणाला नको असते? अशीच एक भाग्यवती या गाथेत दृष्टीसमोर उभी राहते. अवतीभोवतीचे गार पाणी, त्याच्या विशाल छातीवर विसावलेले, दबलेले तिचे स्तनकलश, गार पाण्यातही शरीरात उत्पन्न झालेली ऊब - हा सर्व गहिरा अनुभव या गाथेत मांडलेला आहे. क्वचित् त्याच्या तळहातावर विसावलेला, हातात न मावणारा तिचा स्तनभार, त्यामुळे अंगांगात लकाकून गेलेली वीज या अनुभवामुळेच तिच्या कपोलावर काटा आला आहे. तिची नजर गहिरी अन् निश्चल झाली, चेहरा प्रफुल्ल झाला! एवढे परिवर्तन जलाशयातील एका गाढ आलिंगनाने झाले!

महाराष्ट्री प्राकृत गाथा १३

उप्पाइअदव्वाणँ वि खलाणँ को भाअणं? खलो च्चेअ। 
पक्वाइँ वि णिम्बफलाइँ णवरँ काएहिं खज्जन्ति।। 

अर्थ : दुष्टांनी द्रव्य संपादन केले तर ते त्याचे दान कोणाला करतात? अर्थात हलकटांनाच. लिंबाची फळे पिकली तरी ती कावळेच खाणार.

स्पष्टीकरण : उत्तम व्यवहाराने नव्हे, तर अधम व्यवहाराने पैसा मिळविणारे दुष्ट लोक असहाय लोकांना लुटतात आणि त्या दुष्टांना गणिका, कलाल आणि कोतवाल लुटतात. एकूण काय, तर वाईट मार्गाने आलेली संपत्ती त्याच मार्गाने निघून जाते, हेच सत्य या गाथेत ध्वनित झाले आहे. काळा बाजार करणारे द्रव्य मिळवतात. पण त्याचा विनियोग वाममार्गाकडेच होतो. चांगल्या मार्गाने हे द्रव्य जात नाही. द्रव्य चांगले किंवा वाईट कधी नसते, पण ते संपादन करण्याचे मार्ग मात्र चांगले किंवा वाईट असतात. सज्जनाजवळ द्रव्य कमी असेल, पण त्याचे हृदय मात्र, मोजता येणार नाही इतक्या अफाट दैवी संपत्तीने भरलेले असते. दुर्जनाजवळ द्रव्य प्रचंड असले तरी त्याच्या हृदयात मात्र अंधारच दाटलेला असतो. त्याचा पैसा हलकट लोकांच्याच खिशात जातो. कडुनिंबाची फळे पिकली तरी ती खातात कावळेच! इतरांना त्या फळांचा उपयोग होत नाही. तशी दुष्टाची संपत्ती सज्जनांच्या आणि सन्मार्गाच्या उपयोगी पडत नाही. निंबोळ्यांचा उपयोग, पांढ-या कपड्यातील का असेना, पण कावळ्यांनाच होतो.

महाराष्ट्री प्राकृत गाथा १४

चावो सहवसरलं विच्छिवइ सरं गुणम्मि वि पडन्तम्। 
वंकस्स उज्जुअस अ संबंधो किं चिरं होई?। 

अर्थ : बाण स्वभावत: सरळ असतो (व धनुष्य वक्र असते). धनुष्याच्या दोरीवर बाण चढविला की ते बाणाला तात्काळ फेकून देते. सरळ व वक्र यांचा संबंध चिरकाल कसा टिकेल? 

स्पष्टीकरण : धनुष्य आणि बाण या प्रतिमांतून मनुष्याचे स्वभावगुण सांगितले आहेत. काही माणसे बाणासारखी सरळ असतात तर काही धनुष्यासारखी वाकडी. धनुष्य आणि बाण एकत्र येतात, पण किती काळ? अगदी क्षणकालच. धनुष्यावर बाण चढवला रे चढवला की धनुष्य बाणाला दूर फेकून देते. त्याप्रमाणे वक्र म्हणजे कपटी माणसे सरळ स्वभावाच्या व्यक्तीला जवळ करतात आणि लगेच लांब फेकून देतात. म्हणून सरळ माणसाने कपटी माणसापासून सावध असले पाहिजे. धनुष्यासाठी उत्तम जातीचा बांबू वापरतात. दोन्ही टोकांना दोरी बांधल्यामुळे धनुष्य वक्र होते. वक्रतेत सौंदर्य असते. सखी या निमित्ताने नायिकेला सांगते की, ‘बाई ग, त्याचे रूप आणि शौर्य पाहून तू त्याच्यावर भाळलीस हे खरे. पण तो धनुष्यासारखा आहे. त्याचे गुण तुला ठाऊक नाहीत. तू बाणासारखी सरळ आहेस आणि तो धनुष्यासारखा वक्र. तो तुला जवळ करील आणि कार्यभाग साधताच दूर फेकून देईल. म्हणून त्याच्यापासून सावध राहा.'

महाराष्ट्री प्राकृत गाथा १५

तावमवणेइ ण तहा चन्दनपंको वि कामिमिहुणाणम्। 
जह दूसरहे वि गिम्हे अण्णोण्णालिंगणसुहेल्ली।। 

अर्थ : असह्य अशा ग्रीष्मातही प्रेमी जोडप्याचा ताप चंदनाच्या लेपाने नष्ट होत नाही. आलिंगनाच्या विलासामुळे प्राप्त होणा-या सुखानेच तो शांत होतो.

स्पष्टीकरण : प्रेमीजनांची बातच और. सर्वसामान्यांपेक्षा त्यांचे भावविश्व विलक्षण असते. सामान्यत: उन्हाळ्यात अंगाची काहिली होते. त्यावेळी दुस-याचा अंगस्पर्श ऊष्मौत्पादक आणि असह्य असतो. उष्णकाळात स्पर्शामुळे ताप वाढतो. कमी होत नाही. तो चंदनादी शीतलोपचारांनी कमी करावा लागतो. पण प्रेमाचे तंत्रच वेगळे. प्रेमाचा उद्भव मनस्तापाला कारणीभूत असतो आणि आलिंगन ऊष्मौत्पादक असते. तरीही प्रेमी जीवांना ते शीतल आणि सुखकारक वाटते. अगदी ज्ञानेश्वरांची विरहिणी देखील म्हणते- ‘न लवा चंदनु, न घाला विंझणवारा, तयाविण शून्य शेजारू गे माय।' - माझ्या अंगाला चंदन लावू नका की पंख्याने वारा घालू नका. त्यामुळे माझे अंग शीतल होत नाही. माझी शय्या सुनी पडली आहे. तेथे श्रीहरी असला तरच मला शीतलता लाभेल. अन्यथा नाही. हीच प्रेमाची रीत या गाथेत सांगितली आहे. आलिंगन ऊष्मौत्पादक असले तरी त्यामुळेच प्रेमीजनांच्या शरीराला शीतलता लाभते, त्यांचा ताप नष्ट होतो.

महाराष्ट्री प्राकृत गाथा १६

गअ, गंडअ, गवअ, सरभ, सेरिह, सद्दूल, रिक्ख जाईणं। 
थणआ वाहवहूए अभअं दाउं व णिक्कंता।। 

अर्थ : हत्ती, गेंडा, गवा, शरभ, (अष्टपद सिंह), सैरिभ (रानरेडा), शार्दूल व अस्वल या अरण्यातल्या श्वापदांना अभय देण्यासाठीच जणू व्याध स्त्रीचे स्तन पुढे सरसावले. 

स्पष्टीकरण : स्त्रीच्या बहरात आलेल्या तारुण्याची महती गाथाकवींनी वेगवेगळ्या पद्धतीने गायिली आहे. व्याध स्त्री रंगाने काळी किंवा सावळी असेल, परंतु रानातल्या मोकळ्या वातावरणात निसर्गाने तिला मुक्त हस्ताने पुष्टयौवन बहाल केले आहे. तिची भरदार वक्षस्थळे हा तर तिच्या यौवनाचा मानबिंदूच. ती वयात आली अन् तिची छाती भरदार झाली. ती न्याहाळण्यात व्याध तरुण घटकान् घटका घालवू लागले. अरण्यात शिकारीला जाईनासे झाले. तिच्या भरदार वक्षस्थळाने असे तरुणांना वेड लावले. त्यांनी शिकार सोडून दिल्यामुळे अरण्यातल्या श्वापदांना जीवदान मिळाले, जणू काही श्वापदांना अभय देण्यासाठीच व्याध स्त्रीचे स्तन विशाल झाले, भरदार होऊन पुढे आले! तिच्या प्राप्तीसाठी एखाद्या वेळी कदाचित् पुरुषांचे प्राण जाण्याचा संभव आहे, परंतु तिच्यामुळे श्वापदांना मात्र प्राणदान मिळाले एवढे खरे. 

महाराष्ट्री प्राकृत गाथा १७

उट्ठन्तमहारम्भे थणए ढट्ठूण मुद्धवहुआए। 
औसण्णकवोलाए णीससिअं पढमघरिणीए।। 

अर्थ : आरंभीच उठावदार असणारे नववधूचे स्तन पाहून खोल गाल गेलेल्या प्रथम गृहिणीने नि:श्वास सोडला. 

स्पष्टीकरण : एका पुरुषाला अनेक स्त्रिया असत, अशा काळातली ही गाथा आहे. नववधू घरात आली की जुन्या पत्नीची मानखंडना ठरलेली. नवयौवना आणि व्यतीतयौवना यांच्यामध्ये फरक असणारच. नववधूकडे टवटवीत ताजे तारुण्य तर पहिल्या गृहिणीकडे पतितस्तन, ओघळून गेलेले यौवन. त्यामुळे नववधूचे उठावदार स्तन पाहिल्यावर खोल गाल गेलेल्या प्रथम गृहिणीने नि:श्वास सोडावा हे ओघानेच आले. ती नववधूचे सौंदर्य पाहून बावरली. तिला वाटले असावे की मुग्धावस्थेत एवढे सौंदर्य तर प्रौढावस्थेत ते किती वृद्धिंगत होईल! अजून कळी उमलली नाही तरी एवढी पुष्ट दिसते. हिला पुरुषाचा अंगसंग लाभला तर ही किती पाकळ्यांनी उमलेल कुणास ठाऊक! आपले गाल खोल गेलेले अन् हिच्या गालावर तर गुलाब फुललेले! आता यानंतर पतीच्या हृदयात हिलाच प्रथम स्थान मिळणार आणि यापुढे आपण केवळ गृहिणी म्हणून राहणार, या विचाराने तिने दीर्घ नि:श्वास सोडले.

महाराष्ट्री प्राकृत गाथा १८

रअणायरस्स साहेमि नम्मए! अज्ज मुक्कदक्खिण्णा। 
वेडिसलयाहरंतेण मिलिया जं सि पूरेण।। 

अर्थ : नर्मदे, शिष्टाचार बाजूला ठेवून मी आज रत्नाकराला भेटेन आणि पूर आला होता तेव्हा वेताच्या बेटात तू काय काय प्रेमचेष्टा केल्यास, ते सारे त्याला सांगेन. 

स्पष्टीकरण : नायिका नर्मदेवर रागावलेली आहे. कारण नर्मदेला पूर आला आणि वेताच्या जाळीत तिचे पाणी घुसले. वेताच्या जाळीत प्रियकराला भेटायचा संकेत ठरलेला होता. पण नर्मदेने आगळीक करून संकेतस्थलच नष्ट केले. त्यामुळे प्रियकराची भेट नाही आणि काही नाही. म्हणून नायिका नर्मदेवर चिडली आहे. तिची तिच्या पतीजवळ- समुद्राजवळ चहाडी करायला ती निघाली आहे. परपुरुषासमोर जाऊ नये असा शिष्टांचा आचार आहे. परंतु हा आचार बाजूला ठेवण्याला ती प्रवृत्त झाली. एरवी मी तुझी कागाळी तुझ्या नव-याजवळ केली नसती, पण तू माझी आणि माझ्या प्रियकराची ताटातूट केलीस, म्हणून वेताच्या बेटात घुसून तू काय काय रंग उधळलेस, तिथल्या क्षुद्र खळखळत्या ओढ्यासोबत तू कशी रमलीस, हे मी तुझ्या नव-याला जाऊन सांगेन. ते नको असेल तर पुढे अशी आगळीक करू नकोस.

महाराष्ट्री प्राकृत गाथा १९

हतथफ्फंसेण जरग्गवी वि पण्हहइ दोहअणुणेण। 
अवलोअणपण्हुइरिं पुत्तअ! पुण्णेहि पाविहिसि।। 

अर्थ : धार काढणारा कुशल असला म्हणजे त्याच्या हाताचा नुसता स्पर्श झाला की म्हातारी गायसुद्धा पान्हावते. पुत्रा, नुसत्या दृष्टिक्षेपाने अनुरक्त होणारी स्त्री पुण्याईमुळेच प्राप्त होते. 

स्पष्टीकरण : कोणतीही स्त्री सहजासहजी कोण्या पुरुषावर अनुरक्त होत नाही. ‘माझ्यावर प्रेम कर' असे कुणाला जबरदस्तीने सांगता येत नसते. सांगितले तरी उपयोगाचे नसते. परंतु हातात कौशल्य असले तर प्रेम न करणारी स्त्रीसुद्धा प्रेम करू लागते. हस्तकौशल्याने भाकड गायसुद्धा पान्हावते, त्याप्रमाणे अनुनय केला की प्रौढ स्त्री प्रसन्न होते. केवळ दृष्टिक्षेपाने स्त्री अनुरक्त होत नाही. परंतु नायिका तुला पाहताच पहिल्याच दृष्टिभेटीत तुझ्यावर अनुरक्त झाली आहे. तेव्हा तू किती भाग्यवान आहेस याचा विचार कर. म्हणून मुला, आता विचार करण्यात वेळ दवडू नकोस. घाई कर आणि ती ठरवेल त्या संकेतस्थळी जाऊन तिला भेट. तुझी ही पूर्वपुण्याई समज; असे दूती नायकाला सांगत आहे.

महाराष्ट्री प्राकृत गाथा २०

अज्जं मोहणसुहियं मुअत्ति मोत्तू पलाइए हलिए। 
दरफुडिअवेण्टभारोणआइ हसिअं व फलहीए।। 

अर्थ : मोहनसुखाने तृप्त झाल्यामुळे आर्येने डोळे मिटले. तेव्हा हलधराला (नांग-याला) वाटले की ती मेली. मधून तिला तेथे तशीच सोडून त्याने पळ काढला. नुकत्याच उमललेल्या बोंडाच्या भाराने लवलेली कपाशी हे दृश्य पाहून हसली. 

स्पष्टीकरण : एक मजेशीर प्रसंग येथे उभा केला आहे. डोळे मिटणे, पळून जाणे आणि हसणे अशा विविध भावनांचे संमीलन येथे झाले आहे. सुरततृप्तीमुळे स्त्रियांंचे डोळे मिटतात, हा कामशास्त्राचा सिद्धान्त हलिकाला (नांगर चालवणा-याला) माहीत नव्हता. अनुभवानेही माहीत नव्हता. तिचे मिटलेले डोळे पाहून त्याला वाटले की ती मेली. त्याला वाटले की आपला आवेग हिच्या नाजूक देहाला कसा सहन होणार? आपला आवेग असह्य आहे असे प्रत्येक पुरुषाला उगाचच वाटत असते. आपल्यामुळे ही मेली अशी आपल्यावर तोहमत येऊ नये म्हणून तो पळून गेला. खराच अडाणी! थोडा वेळ थांबला असता तर त्याला समजले असते की एवढ्याने स्त्रिया गतप्राण होत नाहीत. तो पळालेला पाहून कपाशी मात्र स्वत:शीच हसली. कपाशी हीदेखील स्त्रीच. तिला स्त्रीचे रहस्य माहीत आहे. त्याच्या अडाणीपणाचे तिला हसू आले. कपाशी उमलेल्या बोंडाच्या भाराने लवलेली आहे, याचा अर्थ तिला देखील सुरतसुखाचा अनुभव आहे. म्हणूनच नांग-याचे अडाणीपण पाहून तिला हसू आले.

***